विचारांचे वादळ
आज २० ऑगस्ट २०२५. गीता जाऊन ११ दिवस झाले. तिच्या जाण्याची खंत मनाला सतत सलत आहे. वाटलं होतं, ३-४ दिवसांचा राग-फुगवा जाईल आणि परत सगळं व्यवस्थित होईल. पण तसं लवकर होईल असं दिसत नाही. आज ती टाकळीला गेली. मागचे १० दिवस ती मीराकडे थांबली होती. इतके दिवस का थांबली बरं? ती नात्याबद्दल आशावादी होती का? की डुग्गुचा १८ तारखेला वाढदिवस होता आणि दोन दिवस सतत पाऊस पडत होता म्हणून तिने आज जायचा निर्णय घेतला? हे फक्त तिलाच माहीत.
मला माहित आहे रागाच्या भरात मी इतके बोलायला नको होते, हे सगळं पैशावरून झालंय. त्या पैशाचा माज नक्की नाही मला. असता तर मी ५ वर्ष पैसे पैसे करत असतो. जे झालं त्याबद्दल मी माफी पण मागेल. फक्त गीताने पण शांत डोक्याने या पुढे विषय वाढणार नाही यासाठी मनापासून प्रयत्न करावे.
मला आता तिने इथे यावंसं वाटतंय, पण तिलाही इथली थोडी तरी ओढ असावी. वाद झाले तर कधी तिने, कधी मी शांतपणे त्यातून मार्ग काढायला हवा. तिने कधीही टाकळीला पळ काढू नये. इशू असेल, तर वाद विसरून पुढे जावं. एकमेकांबद्दल मनातून नेहमी आदराची भावना असावी. मला काही ताण असेल तर तिने शांतपणे ऐकावं, आणि तिच्या मनात काही सल असेल तर मी ते ऐकून घ्यायला तयार असावं.
मनात सतत विचार येतोय – मागची ५ वर्षं आम्ही फक्त पैशाचाच हिशोब ठेवला का? या काळात कितीतरी वेळा असे क्षण आले जेव्हा आम्ही एकत्र होतो – कधी हसलो, कधी रडलो. पण ते क्षण आठवतच नाहीत का? तिच्या मनात आमच्याबद्दल एवढी कटुता का आहे?
मी माघार न घेण्याची काही कारणे होती, त्यामधले एक म्हणजे इशू समोर भांडणे कमी व्हावी त्याचा त्याच्या वाढीवर परिणाम होऊ नये मला हे नेहमी वाटते. इशू किंवा गुंतवणूक यामध्ये सतत 'माझं' असं बोलून माझी भावना दुखवू नये. 'आपलं' बोलायला मी तिला कितीतरी वेळा सांगितलंय पण मनात जायला स्वतःने प्रयत्न करायला हवेत. मला वाटले भांडण कमी कसे होईल याचा तिने या मधल्या काळात विचार करावा. कदाचित ती जुन्या आठवणी आठवून मला कॉल करेल आणि परत एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का यावर माझ्याशी बोलेल.पण यातलं काहीच झालं नाही
१५ ऑगस्टला गीताची स्कूटी त्यांनी नेली, सोबत लॅपटॉप चार्जर आणि इशूचा ब्रश. ही तिने दिलेली काही हिंट होती का? म्हणजे, सगळं संपलं असं सांगायचं होतं का?
तिच्या घरच्यांशी बरंच बोलणं झाल्यावर त्यांनी फक्त एवढं सांगितलं – "या नात्यात विश्वास नाही." त्यानंतर गीताचा एकमेव कॉल आला तो लॅपटॉप चार्जरसाठी. मग तिने खरोखर सगळ्यांपासून दूर जायचा निर्णय घेतलाय का?
आज ती टाकळीला गेली, म्हणजे तिने नात्याचा विचार केला नसावा. १६ तारखेला मम्मीची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिने एकदाही विचारपूस केली नाही. शस्त्रक्रियेचा निर्णय तिच्याशी बोलूनच घेतला होता. आता असं वाटतंय, तिला न विचारता घेतला असता तर बरं झालं असतं का? तिने इतकं का वाढवलं? यामागे मम्मीचा मोतीबिंदू तर कारण नसेल ना? म्हणजे – तिला इथे बरंच काम करावं लागेल, त्यात तिचे periods… या भीतीने तिने यायला नकार दिला असेल का? इशूचा बहाणा करून तिने आम्हाला त्रास तर द्यायचा नव्हता ना? त्या दिवशी माझी गाडी न्यायची नव्हती, कारण मी अक्का ला आणणार होतो. हेच कारण होतं का? तसेच दवाखान्याची गाडी लागणार, म्हणून तिला आमचा खोळंबा करायचा नव्हता का? असे अनेक विचार मनात घोळत आहेत.
पण एक गोष्ट नक्की आहे, आणि मी आशावादी आहे – गीता भविष्याचा विचार करेल, मनातील सगळं काढून टाकेल आणि परत येईल. ती परत गेली नाही पाहिजे. पण आत्ताचा प्रत्येक क्षण खूप अवघड वाटतोय. मी घरी मोकळेपणाने बोलू शकत नाही, कारण घरच्यांना माझा त्रास दिसला तर ते पूर्णपणे खचून जातील. त्यात मम्मीला सगळ्यात जास्त त्रास होईल, कारण तिचं रडणं थांबत नाही – आणि हे तिच्या डोळ्यांसाठी चांगलं नाही.
गीता आणि इशूची खूप आठवण येतेय. काल एक सीन पाहिला – त्यात नित्या मेनन आणि धनुष यांची केमिस्ट्री पाहून, "आपली पण अशीच जोडी असावी" असं मनापासून वाटलं. गीता परत आली की, तिला खरंच काहीही कमी पडू देणार नाही. इशूबद्दल त्यांनी खरंच विचार कसा केला नाही? त्या एका वर्षाच्या बिचाऱ्या जीवाने कोणाचं काय नुकसान केलंय? त्याला वडिलांच्या प्रेमापासून दूर ठेऊन काय मिळणार? खरंच, इथे दोन जणांचा अहंकार आहे का दोन घरांचा? गीताला कोणी समजावण्याचा प्रयत्न करत असेल का? डिसेंबर-जानेवारीच्या अनुभवावरून तर कोणी केला नसेल असंच वाटतंय.
हे विचाराचे वादळ कधी थांबेल हे देवालाच माहित.
Comments
Post a Comment