तत्त्वाचं भांडण आणि त्याला पैशाचा स्पर्श
आज ९ ऑगस्ट, रक्षाबंधनचा सण. आज गीता मीराकडे जाणार होती. टाकळीवरून तिचा भाऊ, ताई आणि नाना येणार होते. त्यामुळे सकाळी सगळी तयारी उरकून ९ वाजता निघायचा प्लॅन होता. ९ वाजता मीराने मला रिमाइंडर कॉलसुद्धा केला. तेव्हा मी तिला अजून अर्धा–एक तास लागेल, अशी कल्पना दिली.
आज गृहकर्जाचा हप्ता गीता पाठवणार होती. माझी अपेक्षा होती की ती मागच्या महिन्याचा हप्तासुद्धा पाठवेल. पण तिने फक्त या महिन्याचाच हप्ता पाठवला. मी तिला मागच्या महिन्याबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, “तो एक महिन्याचा हप्ता तू मॅनेज करू शकत नाहीस का?” मी तिला सांगितलं की माझा दर महिन्याचा खर्च पगारापेक्षा जास्त आहे, त्यामुळेच मी तुला मागतोय. नाहीतर मी घराचा हप्ता कधीच कमी केला असता, जर तू आधीच सांगितलं असतं तर.
त्यावर ती म्हणाली, “तुला कमी पैसे पडत असतील तर तुझे SIP बंद कर.” हे ऐकून मला राग आला. मी “ठीक आहे, मी हप्ता बघून घेतो” असं सांगून बेडरूममधून बाहेर पडलो. यावर ती भयंकर चिडली. तिचा स्वभावच आहे—बोलताना कोणी मध्येच निघून गेला तर ती खूप चिडते. तिने तोंडाने काही बोललं नाही, पण तिचा चेहरा सगळं सांगत होता.
मग शिरा खाऊन मी खाली गाडी काढण्यासाठी गेलो. सणाचा गोडवा अजून हवेत होता, पण मनात मात्र कडवटपणा पसरला होता.
पार्किंगमधून गाडी बाहेर काढून, तिला आणि बाळाला आणण्यासाठी मी परत लिफ्टने वर गेलो. पप्पांना गुडबाय करून, इशू आणि आम्ही आमची स्वारी सुरू केली. गाडीत मी नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली, पण तिच्याकडून प्रतिसाद येत नव्हता. मला जाणवलं—तिचा राग अजूनही गेला नव्हता. म्हणून मी जास्त काही बोललो नाही.
सुतारवाडी क्रॉस केल्यावर तिने मला, “५००० रुपये पाठव,” असं सांगितलं. मी विचारलं, “कशासाठी?” आणि तिला आठवण करून दिली की मागच्या महिन्यात दिलेल्या ५००० रुपयांतून फक्त २००० रुपयेच खर्च झाले होते. पण तिची मला कोंडीत पकडायची तयारी सुरूच होती—कारण सकाळीच मी ३०,००० रुपये मागितले होते, हे तिचं निमित्त होतं.
ती म्हणाली, “तू तुझ्या घरच्यांना दर महिन्याला देतोस, मग मला का देऊ शकत नाहीस?” मी परत खर्च वाढल्याची आठवण करून दिली. त्यावर पुन्हा तिने, “SIP बंद कर,” असं सांगितलं. मी तिला सांगितलं, “SIP चा वापर पुढे इशूच्या भविष्यासाठी होणार आहे, त्यामुळे मी ते बंद करणार नाही.” मग मी सुचवलं, “तुझा emergency fund वापर, तो अशा गरजेसाठीच असतो,” हेही आठवण करून दिलं.
हे ऐकताच ती अजूनच चिडली. मी संभाषण टाळायचा प्रयत्न करत होतो, पण तिला ते आवडलं नाही. ती अधिक त्वेषाने बोलू लागली—“तुम्ही माझा पैशासाठीच वापर केला आहे इतके दिवस.” हे ऐकून मला राग आला. मी तिला सांगितलं, “तुझे घरचे म्हणजे नाना आणि ताईच तुझा वापर करतात, असं राधिकाने सांगितलंय.”
हे ऐकून ती संतापली आणि मोठ्या आवाजातच म्हणाली, “त्या बाईचं नाव नको घेऊस!” मग तिने, “ही गाडी माझी आहे,” असं सांगितलं. मी लगेच आठवण करून दिली, “मी सुद्धा यात योगदान दिलं आहे.” त्यावर ती म्हणाली, “मी तुला तुझे पैसे पाठवते, आधी उत्तर तू खाली.”
मग तिने माझ्यावर आरोप केला की, “तू माझ्या बिझनेससाठी सपोर्ट करत नाहीस.” मी रागात उत्तर दिलं, “तुझ्या घराण्यात कोणी बिझनेस केला नाही, त्यामुळे तुला जमणारही नाही.” त्यावर तीही रागात म्हणाली, “तुला पण कधीच बिझनेस जमणार नाही.”
मी ठामपणे सांगितलं, “मला बिझनेस करायची इच्छा नाही. मी आयुष्यभर नोकरीच करणार.” शब्दावर शब्द चढत होते, आणि आपल्याला दोघांनाही जाणवलं नाही की भांडण वाढत चाललं आहे. फक्त आपापली बाजू ओरडून मांडणं सुरू होतं.
या सगळ्या घडामोडीत इशू तिच्या मांडीवर होता, पण तिला याची कल्पना का बरं नसावी? ती अजूनही मोठ्याने, रागातच बोलत होती. मी तिला इशूसाठी शांत व्हायला सांगितलं, तरी तिच्या बोलण्यात काही फरक पडला नाही. Prayeja सिटी जवळ आल्यावर तिने पुन्हा मला, “खाली उतर,” असं सांगितलं. मी तिचं काही ऐकलं नाही.
मग तिने मोर्चा माझ्या आईकडे वळवला—“तुझ्या आईला काही वाटत नाही का? मला दुसऱ्या नोकरीला जाणाऱ्या मुलींची उदाहरणं देत असते.” मी तिला सांगितलं, “तिचा उपदेश मला दुखवायचा नसतो.” कॅनॉल रोडकडे वळताना तिने म्हणाली, “तुझ्या आईचं आधी गटार बंद कर.” त्यावर मी रागाने प्रत्युत्तर दिलं, “तुझीच आई रोज गटार ओकत असते.”
हे ऐकताच ती चिडून माझी कॉलर पकडू लागली. आता मी ड्रायव्हिंग करत होतो—याचं भान तिने ठेवायला हवं होतं. तिचा पवित्रा अजूनच हिंसक झाला. मी कसाबसा तिच्या हातातून माझी कॉलर सोडवली आणि लवकरात लवकर मीराकडे पोहोचायचा विचार करू लागलो.
रागात तिने मला सांगितलं, “मी परत येणार नाही.” मी शांतपणे उत्तर दिलं, “तुला नसेल यायचं तर नको येऊ.” जवळ आल्यावर, गाडी थांबवल्यावर, तिने ठामपणे सांगितलं, “तू ही गाडी अजिबात न्यायची नाही.” मी गाडीची चावी सीटवर टाकली आणि मागच्या बॅग्स काढू लागलो. त्यावर तिने बॅग्स तसेच ठेवून मला निघून जाण्यास सांगितलं. मी तिचं ऐकलं नाही, बॅग्स उचलल्या आणि चिखल तुडवत धावत मीराच्या बंगल्याकडे गेलो.
वर जाऊन बॅग्स ठेवल्या. मीरा आणि दाजी घरात होते. मी त्यांना फक्त दोन वाक्य बोललो—“गीताचं माझं भांडण झालंय. गाडी इथेच ठेवून चाललोय.” आणि मी गाडीपाशी परत निघालो. गाडीपाशी पोहोचल्यावर चावी मागितली. तिने विचारलं, “कशाला?” मी सांगितलं, “काचा वर घ्यायच्या आहेत.” पण तिने चावी दिली नाही. मग मी बाळाला थोडा वेळ घेतलं. तेव्हा मीरा आली. मी काही न बोलता निघालो.
मीरा गीताला काय झालं म्हणून विचारत होती, पण मला माहित नाही त्यांचं काय बोलणं झालं. मी खूप पुढे चालत गेलो होतो, आणि थांबायचा विचार नव्हता—स्वाभिमान दुखावला होता. मागून गीताने २–३ वेळा मला आवाज दिला, पण मी तिला, “मला नाही थांबायचं,” असं सांगून पुढे निघालो. कॉर्नरला पोहोचल्यावर मागे वळून पाहिलं तेव्हा ती दिसत नव्हती. मी तसाच नांदेड सिटीच्या दिशेने चालू लागलो.
मी अक्काला फोन करून सांगितलं, “मला गाडी आणता येणार नाही, मीरा कडे ठेवली आहे. मी तुझ्याकडे रिक्षाने येतोय.” तिने शांतपणे ऐकलं आणि “ये” असं सांगितलं. काही अंतर चालल्यावर काही दुकाने आली, तिथे थांबलो. थोड्या वेळाने पप्पांचा फोन आला—“गीता म्हणतेय, पैशावरून अतुलने भांडण केलं, आणि ती परत येणार नाही.” मी पप्पांना सांगितलं, “टेन्शन घेऊ नका, मी घरी आल्यावर बोलू.”
मम्मीने अक्कालाही सांगितलं होतं. अक्काचा पुन्हा मला फोन आला, आणि मी तिला सगळं सविस्तर सांगितलं. आता विषय खरंच खोलवर गेला होता. मी मनाशी ठरवलं—आता काही केल्या माघार घेणार नाही. मला माहित आहे, पैसा महत्त्वाचा आहे, पण घर सोडून जाणं एवढं जर महत्त्वाचं असेल, तर आत्ताच ठरवायला हवं—नातं महत्त्वाचं की पैसा?
जेवढा मी विचार करत होतो, तेवढी गीताची मनातील किंमत कमी होत होती. ती ७ महिन्यांपूर्वी पुण्यात आली, तेव्हा म्हणाली होती—“बाळासाठी आलेय.” मग आता मध्येच पैसा कुठून आला? तिने ६ महिन्यांत ६ वेळा बाहेरचे दौरे केले, त्यात बाळ ४ वेळा आजारी पडला. शेवटच्या वेळी तर इतका आजारी झाला की एक आठवडा त्याचा आवाजसुद्धा नव्हता. तरीही ती मान्य करायला तयार नव्हती की तिने थोडं थांबायला हवं. एखाद्याला धडा शिकवताना बाळाचे असे हाल होत असताना, खरंच तिला याचा विसर पडला होता का?
तिला खरंच बाळाचा विचार आहे का? कारण याआधी ३–४ वेळा बाळासमोर वाद झाले आहेत. तेव्हा मी तिला, “बाळासमोर नको,” असं सांगितलं होतं. पण तिच्या मते, राग आला की तो लगेच शांत करावा लागतो, आणि त्यासाठी समोरच्याने माघार घ्यायलाच हवी.
माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता—लास्ट टाईम सुद्धा मी बाळासाठीच माघार घेतली होती. पण त्याने मला गीता मला कैदेत ठेवल्यासारखी भावना निर्माण झाली होती. या वेळी मात्र गीताने स्वभाव बदलायलाच हवा. हा फक्त माझा नाही, तर बाळाच्या पुढच्या २० वर्षांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दोघांची भांडणं बाळासमोर नकोत. आधीही दोन वेळा भांडताना पाहून बाळ रडायला लागला होता, आणि त्याला थांबवायला बराच वेळ लागला होता.
मला आमच्या वादांमध्ये कपात करून इशूसाठी चांगलं वातावरण तयार करायचं होतं. पण मी कितीही समजूत काढली, तडजोड केली, तरी गीता काहीतरी नवीन उकरून काढतच होती. मला इशूची खरंच काळजी वाटत होती. त्याचा एकच दोष—त्याने आमच्या घरात जन्म घेतला.
मला त्याला ते सगळं शिकवायचं होतं जे मी लहानपणी शिकलो होतो आणि ज्यासाठी माझ्यात अजूनही उत्सुकता आहे. मला फक्त गीताचा आधार हवा होता. पण तिची ओढ सगळी माहेरीच होती. त्यामुळे हे कधीच शक्य नव्हतं. तिच्या मनात सतत पैशाविषयी संशय—की तिचा पैसा मी खर्चून टाकीन. माझ्या स्वभावात ते नाही, हे तिला कित्येकदा समजावलं होतं.
जिथे घराला खरोखर गरज होती तिथेच मी मदत मागायचो. हे तिलाही माहित होतं की मागच्या ३ महिन्यांत सतत २०,०००–३०,००० रुपये जास्त खर्च होत होता. म्हणूनच मला थोडं आर्थिक दडपण होतं. मी तिला हे सांगितलं होतं आणि विचारलंही होतं की, “काही महिने सपोर्ट करशील का?” पण नाही—उलट तिने घराचा EMI कमी करायला सांगितलं. मी शांतपणे त्याला होकार दिला.
मी तिला विचारलं कारण तिच्या मागच्या कंपनीची सेटलमेंटचे ९ लाख रुपये आले होते. तसंच, तिने आधीच सांगितलं होतं की, “४–५ महिने मी पाठवते.” त्यामुळे मी EMI कमी करण्याचा विचार पुढे ढकलला होता. कदाचित करावाही लागला नसता, कारण शिफ्ट झाल्यावर भाडं तिकडे वळवलं असतं.
जर तिने घराचं पझेशन मिळेपर्यंत मला मदत केली असती, तर मला खूप आधार मिळाला असता आणि डोक्यावरचं नाहक टेन्शनही कमी झालं असतं. मागच्या महिन्यात शिशिर भेटला होता. मी त्याला माझा प्रॉब्लेम सांगितल्यावर, त्याने मोठ्या मनाने सांगितलं—“तुला काही मदत लागली तर सांग.” तेव्हा मला जाणवलं—अशा शब्दांनीसुद्धा किती मोठा आधार मिळतो.
१-२ दिवस तेच विचार मनात येत होते… हे टाळता आलं असतं का? नक्की ३०,००० रुपयांचा प्रश्न होता का? त्या ३०,००० रुपयांपेक्षा खरंच इशूला आई-वडिलांची साथ महत्वाची नव्हती का? माणसाने अहंकार बाळगून बाळाची अशी खरंच फरफट होऊ द्यायची का?
अजून एक विचार मनात येत होता—आईची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर तिला कामाचा लोड पडेल, त्यामुळेच तिने घरापासून काही दिवस लांब जाण्याचा निर्णय घेतला असेल का? हे लवकरच समजेल.
गणपती बाप्पा २७ तारखेला येणार आहेत. बाळाचं दुसरं वर्ष आहे हे. मागच्या वर्षी तो काहीच समजण्याच्या मूडमध्ये नव्हता. यावेळी तर त्याला नाचताही येतंय.
११ तारखेला गीता, नाना आणि भाऊ सकाळीच ८.२० ला घरी आले, इशूचं आणि तिचं सामान न्यायला. तिने काही न बोलता बेडरूम आणि किचनमधलं सामान हॉलमध्ये आणून ठेवलं. काही न राहवून पप्पांनी विषय काढला आणि बोलणं सुरू झालं.
एक गोष्ट बोलताना लक्षात आलं की काही गोष्टी वाढवून सांगितल्या होत्या आणि एक खोटं चित्र तयार केलं होतं. म्हणजे, मी गीता ला घरी नको येऊ असं बोललोय, परत मीरासमोर ३०,००० रुपये देत नाही असं सांगितलं, आणि अजून एक—मीराच्या घरी पायऱ्यांवर मी मोठ्याने सगळ्यांना भांडणाबद्दल ओरडून सांगितलं. यात किती खरं होतं, ते मलाच माहीत होतं.
नाना ना गीताचं खरं वाटलं असणार, हेही तितकंच खरंय. जावयापेक्षा मुलीवर जास्त विश्वास असतोच. एक गोष्ट नानांची खरी होती—आमच्या दोघांमधला अविश्वास सगळ्याला कारणीभूत होता. हे पहिल्याच दिवसापासून मला जाणवत होतं. तरीही मी ही दरी कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत होतो. मला माहीत आहे, माझ्या मनात नेहमी एक चांगलं भविष्य असावं असंच आहे.
किती वेळा नात्याबद्दल शंका आली, तेव्हा पप्पा, मम्मी आणि कधी अक्काने मला समजावून सांगितलं—"तिला वेळ दे." त्यांचा आधार नसता, तर कदाचित मी एक वर्षसुद्धा नातं टिकवू शकलो नसतो. मीही एक पाऊल मागे घेऊन पुन्हा नवीन सुरुवात करायचो.
तिला नेहमी घरात कैद केल्यासारखं वाटायचं. कधी बहिणीकडे, कधी माहेरी जाण्यासाठी ती सतत भांडायची. यामुळे नात्यात कटुता वाढत गेली. दीड वर्ष तर बाळासाठी डॉक्टरांकडे फिरण्यातच गेलं. माझ्या आयुष्यातले ते सगळ्यात कठीण दिवस होते, ज्यावर माझं काही नियंत्रण नव्हतं. कितीतरी रात्री आम्ही जागण्यात आणि रडण्यात घालवल्या. आता ते दिवस संपलेत, तर नवीन संकट उभं आहे.
खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आता थांबतोय. तारीख आहे १२ ऑगस्ट, रात्रीचे ८ वाजून ५ मिनिटे. दोन तासांहून जास्त वेळ झाला आहे मी लिहितोय.
Comments
Post a Comment